नव्या वर्षा, काय रे देशील? नव्या वर्षा काय रे देशील? बोट धरुन सुखाच्या गावात नेशील? नव्या मित्रा, तुझ्या कडे मागू काय? सुखाची साय की समाधानाची कामधेनू गाय?।।१।। नवनवोन्मेष मागू की नवा कोरा उद्देश? मागू तुला नवा ताजा आत्मविश्वासाचा देश की आत्मबळाची वाढती वेस? ।।२।। देशील का मला नवा जोम आणि गोडसा नवहर्षित रोम? की देशील आशेचे नव अंकुरित गोंडस कोंब? ।।३।। नवपल्लवित नात्यांची गर्मी देशील की देशील नव्या नव्या उर्मी? आकांक्षांचे पंख लेवून झेपावलेच जर मी तर देशील ना मला नवीन ध्येयाची वाट ....? उत्तर आयुष्याची शांत पहाट...?।।४।। नव्या वर्षा, तू माझा मी तुझी, चल घेऊ हातात हात शोधू नव्या जगाचा घाट होऊ चैतन्याचे भाट, होऊ चैतन्याचे भाट. ।।५।। सौ. जयश्री पराग जोशी १ जानेवारी २०२५ रात्री १२:२०
वाटते ... विराट अवतार धारण करावा.... मोठ्या मोठ्या बाहूंनी नद्या स्वच्छ कराव्या. जल जीवांची फौज घेऊन सगळी सागर-पात्रं विसळून काढावीत. एक मोठ्ठा झाडू घेऊन जगाच्या अंगणातलं प्लास्टिक झाडून टाकावं. सूर्याला थोडा वेळ फ्रीजमधे झोपवून ठेवावं.... वाळवंटात आंबराई बनवावी आणि हिरवाई पेरावी. हिमालयात शेकोटी पेटवावी आणि दूरच्या शिखरांवर पांघरूणे घालावी. पृथ्वीची आई बनून तिला कुशीत घ्यावी... चंद्राची बहिण होऊन लुटुपुटुची भांडणे करावी.... चांदण्यांचा हात धरुन मोठ्ठा फेर धरावा... आणि... आनंदाचा पावा आसमंतात घुमावा. आणि, आनंदाचा पावा आसमंतात घुमावा. सौ. जयश्री पराग जोशी ५ जून २०२४
हे सुवर्णकेशा, तुज पाहता मधाचा प्याला शोधाया निघालेले फुलपाखरू जाईल विसरुनी दिशा ....इतकी सुंदर आहेस तू...! हे मधुमती,तुझ्या चंचल पदन्यासाने मन्मथमनी स्वर तरंग उठतील इतकी सुंदर आहेस तू....! हे यौवन राणी, लावण्यखणी,तुज पाहता भ्रमर ही आळविल रागिणी इतकी सुंदर आहेस तू...! हे कांचन वर्णी, रुपगर्विता तुज पाहता ग्रीष्म ही होईल रसिक-राणी इतकी सुंदर आहेस तू...!सृष्टि कर्त्याने निर्मिलेली सृष्टी-निर्मात्री तू कुणीही न सुटती तुझ्या गोड पाशातूनी इतकी सुंदर आहेस तू..! आणि,आता हे सुचलंय 👇 हे स्त्री,तू अलका.. तू सुमित्रा कल्पना तू उमा तू तूच वृषाली आणि जयश्री ही तू अवनी-मंदाकिनी मनिषा वीणा साऱ्या ललना झाल्या गोळा तुज पाहून झाला नाद ही खुळा. - सौ. जयश्री पराग जोशी
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा