धूसर आठवणींची सांजवेळ
धूसर हे छायाचित्र, जणू आठवणींची सांजवेळ,
वार्धक्याच्या वाटेवर सुरु झाले विस्मृतीचे खेळ.
पायवाटेवर मावळतीचा तोल आणि क्षितिजावरची ओल;
मागे वळून पाहताना डोळ्यात दाटे काळोख आणि राहून गेलेले बोल.
प्रत्येक चेहरा इथे, एका जुन्या गोष्टीची कडी,
हसणे, रुसणे, सोबत राहणे, जीवनाची ती गोडी.
कधीतरी वाटतं, कालचीच गोष्ट आहे ती,
क्षणार्धातच कळतं, मुठीतून सुटलेली रेती ती.
डोळ्यांनी पाहिलेलं जग, तेच आता होतंय धूसर,
सत्यातील स्वप्ना, आता तूच हा पदर पसर.
आजच्या या सांजवेळी, फक्त एकच माझी आस,
राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास.
राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास.
राहू दे उरलेले क्षण, तुमच्या आठवणींच्या आसपास.
- सौ. जयश्री पराग जोशी
5 ऑक्टोबर 2025
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा