उसवण मनाची

 आत काही तरी तुटलं होतं....

१० डिसेंबर २०२०

पहाट ३:३०

-----------------------------------------------------

ड्रेसची "शिलाई" उसवायला घेतली....

पहिला टाका.... अतिशय घट्ट होता.... "लॉक्ड" होता. 

हो, तो तसा मुद्दामच असतो... "उसवण" होऊ नाही म्हणून.

तो सेफ्टी पिनच्या टोकाने काढला.

सेफ्टी पिनचं टोक "व्हिलन" वाटत होतं...


दोऱ्याचं टोक निघालं....

मग, जसजसा दोन्ही बाजूने दोरा ओढत गेले, मन ही उसवत गेलं त्या बरोबर.


खरं सांगू....! 

डोक्यात उद्रेक करणाऱ्या पाऱ्यासारख्या सुळसुळ विचारांना एकत्र आणून शब्दांत "शिवणं" महाकठीण काम असतं.

शब्दं- तुकडे न सापडून चिडचिड होते, विचारांची लय अस्तव्यस्त होते...

अंतरीच्या भावना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनाला फेकत असतात....


थोडक्यात, 

ड्रेस उसवणं सोपं असेल ही पण, मनाचं "उसवणं" अवघड असतं.


.... चिमटीत आलेला दोरा ओढत होते.... दोरा तुटत होता....

आणी, आत काही तरी तुटत होतं.


"......मन गुंतायला वेळ लागत नाही" असं म्हणतात.

"पाराच" तो ..... सुटला होता.......

पण,

वेळ लागतो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला.


मन आणी दोरा.... "मनाचा दोरा" तुटत होता...... 

माझ्याच भावना माझा "निरोप" घेत घेत बाहेर निघत होत्या....... परत कधीही न येण्यासाठी.


डोळ्याबरोबर मन ही खारावत होतं....

पण, भावना आपल्याच नादात.......

पापण्यांचे बांध फुटत आहेत या कडे लक्ष न देता..... बेफिकीर, बेपरवाह.... ! 

आणी, उसवता उसवता एक गाठ आली, तिचा घट्टपणा जाणवू लागला.


गाठ दोऱ्याची असो वा नात्याची....

सुटण्यास वेळ लागणारच.

इथे तर "तुटत" होती.

आणी, तिच्या बरोबर ......... "आत काही तरी तुटत होतं".


किती वेडी- वाकडी, नागमोडी वळणं येतात नं ड्रेसच्या आयुष्यात...! 

कापडाचे वेगवेगळे आकार जोडून बनवणं कठीण आहे.......

"तोडणं" सोपं आहे म्हणतात....


पण,

तुटू नये म्हणून जोडतांना घातलेली प्रत्येक शिवण जेव्हा "उसवते" ना, तेव्हा "वस्त्राच्या तान्याबान्यात" गुंतलेले मनाचे दोरे तुटतात.

रक्तबंबाळ व्हायला होतं........


हो, उसवता उसवता सेफ्टी पिनचं टोक बोटात घुसलं होतं.

बोटाच्या टोकावर रक्ताचा एक टप्पोरा थेंब मनाची "उसवण" बघत होता.

वेदनेने हुळहुळत होतं.... हो, बोट आणी मन ही.....

"आत काही तरी तुटलं होतं." 


ड्रेस (?) उसवून झाला होता.

शिलाईची "माया" ..... अगदी "मोकळी" (रिकामी) झाली होती. उदास वाटत होती.....

अंतराअंतरावर पडलेली भोकं भकास वाटत होती...... 


हो....., जीव ओवाळून टाकलेला एक एक

बंध तुटला होता नं...! 


दूर कुठेतरी गाणं लागलं होतं.....


उसवलं गनगोत सारं .....

आधार कुनाचा न्हाई

भेगाळल्या भुईपरी जीणं 

अंगार जीवाला जाळी...... 


- सौ. जयश्री पराग जोशी 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य