अंधार आणि प्रकाशाची रेशीमगाठ
२४/०३/२०२४ , सायंकाळी ६:४० ते ८:४०
बेंगलोर ते बडोदा - पहिला विमान प्रवास (त्या दिवशीचा तिसरा)
दृश्य: विमानाची खिडकी
जणू जमिनीवर पडलेले चांदण्यांचे घोस...
प्रत्येक कणाला जणू प्रकाशमान होण्याचा सोस||१||
जणू परमेश्वराने मांडलेला खेळाचा सुंदर पट..
जणू ओसंडून वाहणारे चंदेरी घट.... ||२||
जणू नाजुकशा शहरात आणि रांगड्या गावाच्या मधे धरलेले प्रकाशाचे अंतरपाट......
जणू अंधार आणि प्रकाशाची रेशीमगाठ.... ||३||
जणू गावांच्या-शहरांच्या गळ्यातील चमचमत्या माळा...
जणू अंधारात फुललेला तेजफुलांचा मळा...... ||४||
जणू अंधाराला दाखवलेली "दीपवाट"
जणू मानवी अस्तित्वाचे लुकलुकणारे तेजस्वी हाट... ||५||
जणू दिव्यांच्या माळा, दिव्यांचे हारतुरे
जणू मानवाच्या प्रगतीचे तेजस्वी धुमारे... ||६||
जणू ताटव्यांमधून भरुन ठेवलेले प्रकाश पुंज
जणू वृंदावनातील शोभिवंत कुंज ||७||
प्रकाशाची गावं...... आणि त्या प्रकाशाच्या गावात जाण्यासाठी प्रकाशाच्याच पाऊलवाटा....
प्रकाशाची घरं आणि प्रकाशाचीच छतं
प्रकाशीत मनांच्या प्रकाशीत गाथा.... ||८||
कुठे तरी दिसला मला प्रकाशाचा तारामासा..
घेत होता हळूच मानव विकासाचा कानोसा||९||
प्रकाशाचे चौकोन, प्रकाशाचे त्रिकोण....
जणू परमेश्वराने बनवलेल्या रहस्यमय आकृत्या
रात्रीच्या झोपलेल्या गावात फक्त चांदण्या श्वसत होत्या||१०||
होळीच्या दिवशी, दिवाळीची रात्र
आयुष्यात सुरू झालं एक नवीन सत्र ||११||
दिव्यांचा रत्नाकर, दिव्यांचे तलाव, दिव्यांच्या नद्या
प्रकाशाची दीप कळ्या, होळीच्या शिखा-ज्वाळा
प्रकाशाचा धबधबा, कुठे तरी मधे दीपस्तंभ उभा
अंधाराच्या हृदयात तेजाचा गाभा||१२||
चांदण्यांच्या नदीत ..... चांदण्यांच्या बोटी
हळूहळू आकारत गेलं शहर कर्णावती||१३||
- सौ. जयश्री पराग जोशी
२५/०३/२०२४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा