नव्या वर्षा काय रे देशील?
नव्या वर्षा, काय रे देशील?
नव्या वर्षा काय रे देशील?
बोट धरुन सुखाच्या गावात नेशील?
नव्या मित्रा, तुझ्या कडे मागू काय?
सुखाची साय की समाधानाची कामधेनू गाय?।।१।।
नवनवोन्मेष मागू की नवा कोरा उद्देश?
मागू तुला नवा ताजा आत्मविश्वासाचा देश की आत्मबळाची वाढती वेस? ।।२।।
देशील का मला नवा जोम आणि गोडसा नवहर्षित रोम?
की देशील आशेचे नव अंकुरित गोंडस कोंब? ।।३।।
नवपल्लवित नात्यांची गर्मी देशील की देशील नव्या नव्या उर्मी?
आकांक्षांचे पंख लेवून झेपावलेच जर मी
तर देशील ना मला नवीन ध्येयाची वाट ....?
उत्तर आयुष्याची शांत पहाट...?।।४।।
नव्या वर्षा, तू माझा मी तुझी, चल घेऊ हातात हात
शोधू नव्या जगाचा घाट होऊ चैतन्याचे भाट,
होऊ चैतन्याचे भाट. ।।५।।
सौ. जयश्री पराग जोशी
१ जानेवारी २०२५
रात्री १२:२०
वाह सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद, निलेश.
उत्तर द्याहटवा