काय काय देऊ तुला?

 काय देऊ तुला? 

कोवळ्या उन्हाचा पसाभर कवडसा? 

की........ 

माझ्या मनाचा, "तुझं प्रतिबिंब अडकलेला जादुई आरसा"? 

काय देऊ....! 

ओंजळभर मोगरी सुगंध? 

की...... 

सावळ्या मातीने बनलेल्या माझ्या देहाचा मृद्गंध? 

सांग ना रे, काय देऊ तुला? 

ओला ओला भरार वारा? 

की.... 

माझ्या निथळणाऱ्या गोलई कुंतलाचा भोवरा? 

काय देऊ? 

शुभ्र पांढरा समुद्री फेस? 

की.... 

माझ्या गालावरची हास्याची रेष? 

काय देऊ? 

निरभ्र आकाशातील चांदी? 

की.... 

तुझ्या मुख चंद्राला पहातानाची डोळ्यातील धुंदी? 

आशाच्या गाण्यातील प्रणय गंध की माझ्या देहाचा स्पर्शगंध? 

आकाशातील टिपूर चांदण्यांचं आंदण की माझ्या ओठांवर कोरलेलं गोडीचं गोंदण? 

देऊ तुला नुकतीच उमललेली जुई ची कळी? 

की देऊ "तुझ्या कडे पाहून गुलाबी झालेली कानाची पाळी"? 

काय देऊ सांग ना...! 

वाळुतला छोटुसा शंख? की माझ्या प्रीतपाखराचे रत्नकांचनी पंख? 

वाहत्या पाण्याचा खळाळ देऊ की माझ्या देहाच्या वैशाखी भावनांचा सोनेरी झळाळ देऊ? 

नव्या, ताज्या मोत्याचा गोलमट वेज देऊ की माझी चुंबन- गुलाबी शेज देऊ? 

पावसाळी घनाची चंदेरी किनार देऊ की म ऊ - मसृण उरोजाचे उत्तुंग मिनार देऊ? 

उंच डोंगरावरून पडणारी जलधार देऊ की तुझ्या झुलत्या खांद्यांना रेशमी आधार देऊ? 

तुझ्या मनाच्या परडीत, माझ्या भावनांनी भिजलेला शब्द देह ठेवलाय...! तू फक्त घे...! 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य