व्याकुळता

 लहानपणी गाई चरायला घेऊन जातांना - काठी

वाजवण्यासाठी - बासरी/वेणू

खोवण्यासाठी - मोरपीस

राधेवर रंग उडवण्यासाठी - पिचकारी

दुसऱ्या जन्मात काय बरं झाली असतील? 

ती काठी... ते मोरपीस

ती पिचकारी... ती वेणू

जर जन्म मिळाला असेल तर 

कोणता बरं मिळाला असेल जणू? 

तुझ्या स्पर्शाचे अणू-रेणू

घालत असतील का त्यांच्या मनी पिंगा रुणुझुणु? 

असेल का वेणू अजून ही गुणगुणत? 

असेल का काठी अजूनही तुझ्या खांद्याचा स्पर्श आठवून  मोहरत... ? 

असेल का मोरपीस तुझ्या कुरळ्या केसांना मनोमनी कुरवाळत...... ? 

असेल का पिचकारी वाट बघत अजूनही तुझ्या हाती येण्यासाठी मान उंचावत... ? 

ये रे कृष्णा, नको असा उभा राहू... ! 

ती चौघे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असतील 

तू त्यांच्या प्रतिक्षा तपाला पाव

भेट त्यांना, घे जवळ, 

त्यांचं प्रेम... त्यांची तुला न भेटता येण्याची अगतिकता... त्यांची व्याकुळता.. 

निमिषार्धात् विलीन होईल रे..!

 ---------

सौ. जयश्री पराग जोशी

७ फेब्रुवारी २०२३





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य