रंगपंचमी

 

पटावरचा असो की पटांगणावरचा....
नियतीचा असो की मनाचा...
खेळ अव्याहत सुरु आहे.
रंगणे आणि रंगवणे सनातन आहे.

कुणी प्रसंग रंगवावा,
कुणी भूमिका रंगवावी.
आणि,
रसिकतेने प्रेमिकेचा गाल ही रंगवावा.

कुणी चित्र रंगवावे,
कुणी संपूर्ण सत्र रंगवावे.
आणि,
आयुष्याच्या रांगोळीत ही मनापासून रंग भरावे.

कुणी प्रणय रंगवावा,
कुणी रात्र रंगवावी.
आणि,
पहाटेच्या स्वप्न कळ्यांना ही नकळत रंगवून जावे.

कुणी सहज जवळ ओढून घ्यावे
मूठभर रंग चोळून जावे
आणि,
बोलता बोलता मनातले मोरपीस ही रंगवून जावे.

मानवाच्या क्षणभंगुर अस्तित्वाच्या आभासात
प्रत्येकाची जीवन बाग फुलून यावी
अशी होळी खेळून जावे.
चिरंतन ठसा उमटवून जावे.

- सौ. जयश्री पराग जोशी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नव्या वर्षा काय रे देशील?

पृथ्वीची आई

नादखुळे सौंदर्य