पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उसवण मनाची

 आत काही तरी तुटलं होतं.... १० डिसेंबर २०२० पहाट ३:३० ----------------------------------------------------- ड्रेसची "शिलाई" उसवायला घेतली.... पहिला टाका.... अतिशय घट्ट होता.... "लॉक्ड" होता.  हो, तो तसा मुद्दामच असतो... "उसवण" होऊ नाही म्हणून. तो सेफ्टी पिनच्या टोकाने काढला. सेफ्टी पिनचं टोक "व्हिलन" वाटत होतं... दोऱ्याचं टोक निघालं.... मग, जसजसा दोन्ही बाजूने दोरा ओढत गेले, मन ही उसवत गेलं त्या बरोबर. खरं सांगू....!  डोक्यात उद्रेक करणाऱ्या पाऱ्यासारख्या सुळसुळ विचारांना एकत्र आणून शब्दांत "शिवणं" महाकठीण काम असतं. शब्दं- तुकडे न सापडून चिडचिड होते, विचारांची लय अस्तव्यस्त होते... अंतरीच्या भावना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनाला फेकत असतात.... थोडक्यात,  ड्रेस उसवणं सोपं असेल ही पण, मनाचं "उसवणं" अवघड असतं. .... चिमटीत आलेला दोरा ओढत होते.... दोरा तुटत होता.... आणी, आत काही तरी तुटत होतं. "......मन गुंतायला वेळ लागत नाही" असं म्हणतात. "पाराच" तो ..... सुटला होता....... पण, वेळ लागतो गुंतलेल्या मनाला आवरा...

पृथ्वीची आई

 वाटते ...  विराट अवतार धारण करावा....  मोठ्या मोठ्या बाहूंनी नद्या स्वच्छ कराव्या.  जल जीवांची फौज घेऊन सगळी सागर-पात्रं विसळून काढावीत. एक मोठ्ठा झाडू घेऊन जगाच्या अंगणातलं प्लास्टिक झाडून टाकावं.  सूर्याला थोडा वेळ फ्रीजमधे झोपवून ठेवावं....  वाळवंटात आंबराई बनवावी आणि हिरवाई पेरावी.  हिमालयात शेकोटी पेटवावी आणि  दूरच्या शिखरांवर पांघरूणे घालावी.  पृथ्वीची आई बनून तिला कुशीत घ्यावी...  चंद्राची बहिण होऊन लुटुपुटुची भांडणे करावी....  चांदण्यांचा हात धरुन मोठ्ठा फेर धरावा...  आणि...  आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.  आणि, आनंदाचा पावा आसमंतात घुमावा.  सौ. जयश्री पराग जोशी ५ जून २०२४

समुद्राचे 'टिपूसपान'

 एकदा समुद्राला लागली तहान म्हणाला मला पाणी आण...  गेले तडक ढगाकडे मागितले पाणी म्हणाला *ज्येष्ठ, सुरु आहे थांब गं राणी*.  तेवढ्यात एका ढगाने ऐकले  आतले टिपूस टवकारुन बसले.  समुद्राची तहान भागवावी कशी कपाळावर बोट ठेवून विचार करु लागले.  हळूच डोकावले बाहेर म्हणाले मला समुद्राची तहान भागवतो चला.  समुद्राचे झाले *टिपूसपान* पावसाचा थेंब खूपच महान.. !  सौ. जयश्री पराग जोशी २४ सप्टेंबर २४ रात्री ११ ३०

ओलुसं पाणी

  इवल्याशा पानवलीवर (अगदी छोटूसं पान) 🍃ओलुसं पाणी... 💧 किती तरी निरागस आणि  खूप खूप गुणी..! ☺ पानवलीचा हात धरुन धरला त्याने फेर 😇 शेतकऱ्याला म्हणाले आता बी पेर. 🌾 हसला शेतकरी म्हणाला तू तर इवलंस पाणी 😃 माझं वावर लय म्होटं तु तं हाय अश्रूच्या थेंबवाणी। 😝 हिरमुसलं पाणी...! मदत करावी होतं त्याच्या मनी। 😔 ओलुसं पाणी लागलं रडु और आणि मग लागला पाउस पडू। 😭 आनंदाने भरला पाण्याचा गडू 🍶ओलुसं पाणी लागले आकाशाला भिडू। 🌨 वावर झालं हिरवं बेट🏞 .... मानले आभार पावसाचे थेट। 🙏 ओलुसं पाणी खुद्कन हसलं, 🤭पानवलीच्या पाठीवर परत येऊन बसलं। 👶 जयश्री - २४ सप्टेंबर २०२४

अंधार आणि प्रकाशाची रेशीमगाठ

 २४/०३/२०२४ , सायंकाळी ६:४० ते ८:४० बेंगलोर ते बडोदा - पहिला विमान प्रवास (त्या दिवशीचा तिसरा)  दृश्य: विमानाची खिडकी जणू जमिनीवर पडलेले चांदण्यांचे घोस...   प्रत्येक कणाला जणू प्रकाशमान होण्याचा सोस||१|| जणू परमेश्वराने मांडलेला खेळाचा सुंदर  पट..  जणू ओसंडून वाहणारे चंदेरी घट.... ||२|| जणू नाजुकशा शहरात आणि रांगड्या गावाच्या मधे धरलेले प्रकाशाचे अंतरपाट......  जणू अंधार आणि प्रकाशाची रेशीमगाठ.... ||३|| जणू गावांच्या-शहरांच्या गळ्यातील चमचमत्या माळा... जणू अंधारात फुललेला तेजफुलांचा मळा...... ||४|| जणू अंधाराला दाखवलेली "दीपवाट" जणू मानवी अस्तित्वाचे लुकलुकणारे तेजस्वी हाट... ||५|| जणू दिव्यांच्या माळा, दिव्यांचे हारतुरे जणू मानवाच्या प्रगतीचे तेजस्वी धुमारे... ||६|| जणू ताटव्यांमधून भरुन ठेवलेले प्रकाश पुंज जणू वृंदावनातील शोभिवंत कुंज ||७|| प्रकाशाची गावं...... आणि त्या प्रकाशाच्या गावात जाण्यासाठी प्रकाशाच्याच पाऊलवाटा....  प्रकाशाची घरं आणि प्रकाशाचीच छतं प्रकाशीत मनांच्या प्रकाशीत गाथा.... ||८|| कुठे तरी दिसला मला प्रकाशाचा तारामासा..  ...

चांदणीचे घर

 सागरी लहरी गाई चंदेरी लकेरी वाट ही गहिरी जाई चांदणीच्या घरी.  सखे चल घाई घाई आता नको थांबू बाई.  सागर निळाई आणि आभाळ निळाई पावलाच्या खाली जणू फेस-मोती ठायी ठायी. मन उचली पाऊल आणि ठेवी पुलावर घेई झेप उंचावून जाई दूर चंद्रावर.  -सौ.जयश्री पराग जोशी  ४ जून २०२४

नव्या वर्षा काय रे देशील?

 नव्या वर्षा, काय रे देशील?  नव्या वर्षा काय रे देशील? बोट धरुन सुखाच्या गावात नेशील? नव्या मित्रा, तुझ्या कडे मागू काय? सुखाची साय की समाधानाची कामधेनू गाय?।।१।। नवनवोन्मेष मागू की नवा कोरा उद्देश? मागू तुला नवा ताजा आत्मविश्वासाचा देश की आत्मबळाची वाढती वेस? ।।२।। देशील का मला नवा जोम आणि गोडसा नवहर्षित रोम? की देशील आशेचे नव अंकुरित गोंडस कोंब? ।।३।। नवपल्लवित नात्यांची गर्मी देशील की देशील नव्या नव्या उर्मी? आकांक्षांचे पंख लेवून झेपावलेच जर मी  तर देशील ना मला नवीन ध्येयाची वाट ....? उत्तर आयुष्याची शांत पहाट...?।।४।। नव्या वर्षा, तू माझा मी तुझी, चल घेऊ हातात हात  शोधू नव्या जगाचा घाट होऊ चैतन्याचे भाट, होऊ चैतन्याचे भाट. ।।५।। सौ. जयश्री पराग जोशी  १ जानेवारी २०२५ रात्री १२:२०