सोनेरी उन्हाळा
उन्हाळा म्हणू की सोनाळा म्हणू?
मोहरलेला गुल
बहरलेला बहावा
वसंताची चाहूल
पाचूं नी मरवा.
दारची तुळस
भगवा पळस
दुपारी १२ चा
सोनेरी कळस.
मामाचा जिव्हाळा
आंब्याचा मळा ,
मातीचे सारवण
आजीचा "खुळा" (वेडा)
अंगणातला चाळा
चुरचुरणारा पाचोळा...
वाळलेला पापड
अंगातलं नवं कापड
मनात घोळा.
उन्हाळी पहाट
रविवारचा हाट
ऊसाचा रस आणि आइस्क्रीम साठी वाट
लवकर पळा.
उन्हाळा म्हणजे गरम गरम झळा
सोनाळा म्हणजे सावळ मामीचा गोतावळा...
तिच्या त्या मोगरकळ्या (सुंदर हास्य)
करी शीतल सगळ्या वेळा.
दुपारची उन्हं
कैरीचं पन्हं
मामीचं बाळ तान्हं
किती गोड हसतं, पहा नं...!
उन्हाळ्यात संध्याकाळी
झाडांची आळी
पाणी घालायला
नुसती पळापळी.
उन्हाळ्याची रात्र
गार गार गात्रं
मनात चैत्र
संगतीला मैत्र.
असा हा उन्हाळा
खूप खूप खेळा.
मित्रांचा मेळा
आजोबा आले की
सुसाट पळा.
- सौ. जयश्री पराग जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा